Monday 29 October 2018

लक्ष्मी पूजन मुहूर्त व विधि 2018

लक्ष्मीपूजन २०१८ (सचिन मधुकर परांजपे)

यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक ०७ नोव्हेंबर २०१८ (बुधवारी) सायंकाळी ६ वाजून ०१ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३३ मिनीटे या कालावधीत मूहुर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३२ मिनिटे) हा आहे. यातही सुक्ष्म मुहूर्तानुसार "संध्याकाळी ७ वाजून ३७ मिनिटांपासून, ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंतचा" काळ अधिक जास्त शुभ आहे हे लक्षात घेणे. (छपन्न मिनिटे) 👈 हा छप्पन्न मिनिटांचा सुक्ष्म मुहूर्ताचा कालावधी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे या काळात तुमचे पूजन सुरु हवे व इतर सर्व ऍक्टिविटिज संपूर्णपणे बंद असाव्यात ही नम्र विनंती आहे. (07.37pm to 08.33pm)

या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मुल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसुन ती "श्री" या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आपल्या घरी व व्यवसायाच्या ठिकाणी आगमन होणे अपेक्षित आहे.

या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य)....मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपुजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते (श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती श्रीविष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका...नुसते मानसिक स्मरण केले किंवा ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप १०८ वेळा करा तरी चालेल)

घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे....पुजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने पण अगदी मनापासुन करावेत. लक्ष्मीपुजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पुजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पुजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा....जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. आधीच्या पॅरेग्राफमधे जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा....ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक यांचेही पाठ करावेत ही विनंती.@सचिन मधुकर परांजपे

(अती महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपुजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. लक्ष्मीपुजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्जवलित असावेत. दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी कुणालाही उधार-उसनवार पैसे किंवा कर्ज अजिबात देऊ नये. त्या दिवशी फक्त सुवर्णखरेदी व जमीन खरेदीचे व्यवहार असतील तरच पैसे खर्च करावेत. आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर अगदी आवश्यक्ता असेल तरच पैसे घराबाहेर जावेत, अन्यथा अजिबात नाहीत. जी काही अत्यावश्यक खरेदी वगैरे करायची असेल ती सकाळी किंवा दुपारीच करावी. थोडक्यात आपण महत्प्रयासाने स्थिरलक्ष्मीसाठी केलेली ही उपासना कृतीतून विरोधात्मक होता कामा नये.).@सचिन मधुकर परांजपे

श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी. काही मंत्र उच्चाराला सोपे असे देत आहे तर काही जरा कठीण आहेत)

१) ॐ श्रीं नम: (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)

२) ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम:

३) ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात

४) ॐ ह्रीम पद्मे स्वाहा

५) ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम:

६) ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:

७) ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे

या व्यतरिक्त तुम्हाला येत असलेली काही लक्ष्मीकारक स्तोत्रे, सूक्ते यांचे पठण तुम्हाला करता येईल. मी स्वत: या कालावधीत तुम्हाला “श्रीसूक्ताचे” मनोभावे पठण करण्याचा सल्ला अवश्य देईन. तुमच्यापैकी अनेकांना "श्रीसूक्त" ऐकुन माहिती असेलच. प्रत्येकाने श्रीसूक्त पाठ करावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे. ते तसं थोडं कठीण असल्याने श्रीसूक्ताचे पुस्तक आणावे, वैदिक सुक्ते नावाची एक सीडी मिळते किंवा युटुयुबवर शोधावे. श्रीसूक्ताचे पुस्तक समोर ठेवून एकीकडे ते कानाने ऐकावे (Listening and reading simultaneously) असं केल्यानंतर तुम्हाला ते नक्की जमेल. लक्ष्मीपूजनानंतरही श्रीसूक्त रोज वाचणे श्रेयस्कर आहे.@सचिन मधुकर परांजपे

घरात सोहेर-सुतक असेल तरी माझ्या मते मानसपूजा करायला काहीही हरकत नाही. हाच नियम ज्या घरात मासिकपाळीची बंधने कटाक्षाने पाळली जातात अशा स्त्रीयांनीही, प्रवासात असणाऱ्यांनी आणि आजारी बेडरिडन व्यक्तिंनीही अंमलात आणावा…मानसपूजा करताना देखील संध्याकाळी आंघोळ वगैरे करुन शांतपणे सुखासनात बसावे (अगदी बेडवर बसलात तरी हरकत नाही) मोबाईल बंद करावा. घरातील कुणीही पुढची थोडावेळ डिस्टर्ब करु नये असे सांगूनच बसावे. बसल्यानंतर डोळे मिटून घ्यावेत आणि वर वर्णन केलेली पूजा जणूकाही आपण प्रत्यक्ष करत आहोत असे समजावे आणि ते “लाईव्ह टेलिकास्ट” नजरेसमोर आणावे. मंत्रजप करावा. मानसपूजेत कोणतीही बंधने नसतात हे ध्यानात घ्यावे आणि हा पर्वणीचा काळ वाया दवडू नये. .@सचिन मधुकर परांजपे

....तर मित्रांनो अत्यंत श्रध्देने आणि वर दिलेल्या शुभपर्वकालात अवश्य श्री महालक्ष्मीपुजन करा. मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो हीच सदिच्छा. पोस्ट पब्लिक पोस्ट आहे त्यामुळे कॉपी-पेस्ट न करता सबंध पोस्ट लेखकाच्या नावासह शेअर करा. आपल्या सर्व बंधुभगिनींना, आप्तेष्टांना मार्गदर्शन होवुन सर्वत्र समृध्दीचे, समधानाचे वातावरण पसरावे हीच श्रीलक्ष्मीनारायणांच्या चरणी प्रार्थना....

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)