Wednesday 17 April 2019

मंगळ दोष माहिती

मंगळ दोष आणि त्यावरील उपाय !!!

मित्रानो आपण बर्याच वेळा मंगळाची पत्रिका किंवा मांगलिक पत्रिका असे शब्दोच्चार ऐकतो. तर आज आपण या मांगलिक दोषावरची शास्त्र शुद्ध माहिती पाहणार आहोत. सर्व प्रथम आपण या मंगळाचे स्वभाव विशेष पाहूयात म्हणजे तुम्हाला या संपूर्ण विषयाची लगेच कल्पना येईल.

ज्या लोकांना मंगळ दोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी , भांडकुदळ असतो. हे लोक लवकर राग येणारे नि रागाच्या भरात हातून गैर कृत्य घडणारे असतात. यांना राग जसा लवकर येतो तसा तो लगेच जातोही. एक घाव दोन तुकडे करणारा यांचा स्वभाव असतो. छोट्या छोट्या गोष्टी वरून लगेच चिडणारे. खुनशीपणा यांच्या अंगी असतो. तसेच रागाच्या भरात जोरात गाडी चालवणारे लोक हे फक्त मंगळाचेच असतात. तसेच जीवनात कोणत्याही कामास लागणारे धाडस या लोकां मध्ये असते. तसेच अचूक निर्णय क्षमता, जलद क्षणार्धात निर्णय घेणारे आणि एकदा निर्णय घेतला कि परत माघे न वळणारे मग तो निर्णय चूक असो किंवा बरोबर असो हे लोक आपल्या निर्णयावर ठाम असतात. प्रभाव शाली झुंझार व्यक्तिमत्व हि या लोकांना मिळालेली निसर्गाची देणगी असते. तसेच जीवनात आलेल्या कोणत्याही वाईट प्रसंगाला धीरोदत्तपणे सामोरे जाण्याची ताकद या मंगळाच्या लोकां मध्ये असते. मसालेदार खाणारे तसेच आवडत्या व्यक्ती साठी खर्च करायला हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. हे लोक मुद्दामहून काही तरी खुसपट काढून भांडणे करणारे असतात. तसेच दुसर्याला तोडून बोलणे टोचून बोलणे आणि एखाद्या गोष्टीला लगेच प्रतिसाद देणारे असतात. एखाद्या गोष्टी बद्दल जास्त विचार न करता अविचाराने कृती करणारे असतात. म्हणून हे लोक प्रेमात देखील लगेच पडतात. ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या साठी वाट्टेल ते दीव्य करायला हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. परंतु आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच ज्याच्या वर प्रेम करतात त्याचा बदला घ्यायला सुद्धा हे लोक माघे पुढे पाहत नाहीत. थोडक्यात काय तर....." भले (नीट वागनार्याशी) तरी देऊ कासेची ( कमरेची) लंगोटी ! नाठाळाचे माथी हाणू काठी !! या संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणे वागणारे हे लोक वागतात.

मांगलिक व्यक्तींचा सेक्शुअली दृष्ट्या स्वभाव कसा असतो हे आता आपण पाहूयात.

या लोकां मध्ये कामवासना खूप प्रबळ प्रमाणात असते. पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि नि:संशय ती व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असते. पण याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही.

आत्ता पर्यंत आपण मांगलिक व्यक्तीचे स्वभाव पहिले आता सर्व प्रथम पत्रिकेतील मंगळ दोष म्हणजे काय हे आपण पाहूयात.

पत्रिकेत मंगळ ग्रह हा प्रथम स्थानी ( तनु स्थानी ), चतुर्थ स्थानी ( सुख स्थानी) , सप्तम स्थानी ( विवाह स्थानी ) , अष्टम स्थानी ( मृत्यू स्थानी ) आणि द्वादश स्थानात ( शैय्या सुख स्थानी ) असेल तर ती पत्रिका मंगळी असते. आकृतीत दाखवलेल्या १, ४, ७, ८, १२ या स्थानात ( घरात ) जर मंगळ ग्रह असेल तर त्या पत्रिकेत मंगळदोष आहे असे मानले जाते. किंवा ती कुंडली मंगळ दोषाची समजली जाते. मंगळ स्वताच्या ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून ४,७,८ या स्थानावर दृष्टी टाकतो. मंगळ ग्रह स्वभावाने तामसी आणि उग्र आहे. हा ज्या स्थानावर बसतो त्याचा नाश करतो आणि ज्या स्थानाकडे बघतो त्यालासुद्धा प्रभावित करतो. तर १, ४, ७, ८, १२ या घरात मंगळ असता तो व्यक्तीच्या जीवनावर असे काय परिणाम करतो हे आपण आता पाहूयात !

१) प्रथम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ पत्रिकेत चौथ्या स्थानी (सुख स्थानी), सातव्या स्थानी ( विवाहा स्थानी ) आणि आठव्या ( मृत्यू ) स्थानावर दृष्टी टाकतो. या मुळे अशा व्यक्तींच्या जीवनात स्वताला अपघात, कुटुंबात कलह , वैवाहिक जोडीदाराशी मत भेद अशा गोष्टी दिसून येतात. व स्वताच्या तप्त स्वभावा मुळे यांचे वैवाहिक जीवन दुषित असते. जोडीदाराशी छोट्या छोट्या गोष्टीवरून काही तरी खुसपट काढून भांडणे काढण्याच्या सवई मुळे तसेच जोडीदाराचे सतत दोष दाखवण्याच्या स्वभावा मुळे यांचे वैवाहिक जीवन दुखी असते. यांची तामसिक प्रवृत्ती दांपत्य जीवन व घर दोघांना प्रभावित करते. बहुतेक करून ह्या लोकांना मैदानी खेळाची आवड असते.

२) चतुर्थ स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ पत्रिकेत सातव्या स्थानी ( विवाहा स्थानी ), दहाव्या स्थानी ( कर्म स्थानी ) , आणि अकराव्या स्थानी ( लाभ स्थानी ) दृष्टी टाकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना विवाहा नंतर नोकरी व्यवसायात अडचणी, आर्थिक विवंचना यांचा सामना करावा लागतो. व त्या मुळे वैवाहिक जीवनात कटकटी निर्माण होतात. या स्थानातला मंगळ व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडवतो व स्वताच्या आईच्या तापट स्वभावा मुळे हा मंगळ दांपत्य जीवनात बाधा आणतो, संपूर्ण जीवन संघर्षमय बनवितो. स्वताच्या मनाविरुद्ध आईच्या पसंतीच्या मुलीशी विवाह करावा लागतो. बहुतेक करून या लोकांच्या शिक्षणात अडचणी किंवा अडथळे दिसून येतात.

३) सप्तम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ दहाव्या स्थानी ( कर्म स्थानी ) , प्रथम स्थानी ( तनु स्थानी ) व द्वितीय स्थानी ( धन स्थानी ) दृष्टी टाकतो. त्या मुळे या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक विवंचना कायम असतात. तसेच कुटुंबात कायम कलह चालू असतात. येथे वैवाहिक जोडीदार तापट स्वभावाचा व भांडकुदळ मिळतो व या जोडीदाराच्या तापट स्वभावा मुळे दांपत्य जीवनात बाधा निर्माण होते. जोडीदाराशी मतभेद वाढवतो आणि हे मतभेद काही वेळा घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात. बहुतेक करून या लोकांच्या नोकरी व्यवसायात अडचणी दिसून येतात. धन लाभ होत नाहीत आर्थिक चिंता कायम सतावत असते.

४) अष्टम स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ अकराव्या स्थानी (लाभ स्थानी), दुसर्या स्थानी ( धन स्थानी) आणि तिसर्या स्थानी ( पराक्रम स्थानी ) दृष्टी टाकतो. त्यामुळे अशा व्यक्तींच्या जीवनात प्रवासात चोरी, अपघात,चोरा पासून भय दिसून येते. तसेच सासुर वाडीशी वाद असल्या मुळे हे लोक बायकोस माहेरी पाठवत नाहीत. तसेच यात व्यक्ती स्वताच्या बेजबाबदार वागण्या मुळे सुखांना पारखा होतो आणि स्वताचे व आपल्या जोडीदाराचे आयुष्य कमी करतो. बहुतेक करून या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. स्त्रियांच्या कुंडलीत हा दोष जोडीदाराचे आकस्मित निधन दाखवतो. साधारण पणे अग्नी पासून जीवितास धोका दिसून येतो.

५) द्वादश स्थानातील मंगळ = या स्थानातील मंगळ तिसर्या स्थानी ( पराक्रम स्थानी ), सहाव्या स्थानावर ( रोग स्थानी ) आणि सप्तम स्थानी ( विवाह स्थानी) दृष्टी टाकतो. त्या मुळे विवाहा नंतर पाठीवरच्या भावंडाच्या बाबतीत अशुभ फळे मिळतात. पाठीवरच्या भावंडाचा अपघात किंवा त्यासम वाईट गोष्टी घडतात. शैय्या सुख स्थानी असलेला हा मंगळ लैंगिक सुखातून वादविवाद निर्माण करतो. विवाहा नंतर आजारपण किंवा अपघात संभवतो. या स्थानातील मंगळ विवाह व शारीरिक सुखाचा नाश करतो. बहुतेक करून या स्थानातील मंगळ हा व्यक्तीला कामांध किंवा कामपिपासू बनवतो व शरीर सुखा साठी व्यक्तीला पाप कर्मे करायला प्रवृत्त करतो. म्हणून या स्थानातील मंगळ व्यक्तीस कामांध पणामुळे स्वताच्या दुखास कारणीभूत होत्तो.

मंगळ दोष केव्हा नाहीसा होतो...

१) मंगळ गुरुच्या शुभ दृष्टीत असेल तर.
२) मंगळ कर्क आणि सिंह लग्नात (मंगळ राजयोगकारक ग्रह आहे) असेल तर.
३) मंगळ उच्च राशीमध्ये (मकर) असल्यास.
४) पत्रिकेत शुक्र, गुरू आणि चंद्र शुभ स्थितीत असल्यास मंगळाची उग्रता कमी होते
५) पत्रिका जुळवणी करताना जर दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत याच जागेवर मंगळ, शनी किंवा राहू ग्रह असेल तर हा दोष कमी होतो.
६) मंगळ फक्त मेष किंवा वृश्चिक राशीत (स्वग्रही) असेल तर नुकसान करत नाही.

सुचना : मंगळाच्या पत्रिकेची जुळवणी केल्यानंतरसुद्धा जातकाच्या स्वभावात उग्रता राहतेच त्या कारणाने त्यांच्यात वैचारिक मतभेद राहणे स्वाभाविकच आहे. म्हणून दोघांना (पती-पत्नी) शांतता आणि सामंजस्य ठेवणे नितांत गरजेचे आहे. मंगळ दोष हा 'दोष' असला तरी अनेकदा मंगळ असलेल्या पत्रिकेचा नीट अभ्यास न करता त्याची भीती मनात घातली जाते. या सगळ्यांमुळे जातकाचा विवाह जमायला अडचण येते.

मंगळ दोषावर उपाय :-
१) गणेशाची उपासना करणे.
२) हनुमानाची उपासना करणे.
३) दुर्गा मातेची उपासना करणे.
४) सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतावर सय्यम ठेवणे व त्या साठी रोज सकाळी १० मिनिटे व रात्री झोपताना १० मिनिटे या लोकांनी ध्यानाची सवय लावून घेतली पाहिजे.

मित्रानो या मंगळ दोषावर बरेच काही लिहिण्या सारखे आहे परंतु हा लेख खूप मोठा झाल्याने आता लिखाण आवरते घेतो. तरी यातून आपणास बरीच माहिती मिळेल असा मला विश्वास आहे. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया तसेच आपले या बाबतीतले अनुभव आपण मला कळवावेत व हि माहिती आपल्या मित्रां पर्यंत पोहोचावी या साठी हा लेख सर्वांनी शेअर करावा हि नम्र विनंती.

संदर्भ:- श्री. सचिन खुटवड सर