Thursday 27 September 2018

Dr. Tatiya an Emotional true story

कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या व्हिजीटर्सकडून माफक व्हिजीटींग फी वसूल करून ती रूग्णांच्या बिलातून वजा करतात अशा आशयाचा एक व्हॉट्स अॅप मेसेज वाचला तेव्हा आमचे धुळ्याचे परममित्र व मार्गदर्शक धरमचंद चोरडीया यांनी पक्षकार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितलेला फार पूर्वीचा एक किस्सा आठवला.
शहाद्याचे डॉ. कांतीलाल टाटीया हे धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील गरीब, वंचित आदिवासी बांधवांच्या सेवेमध्ये स्वतःला पुर्णवेळ झोकून दिलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ स्वयंसेवक व भाजपा चे कार्यकर्ते. जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातील आदिवासी गांवे, पाडे, अतिदुर्गम भागातील लहानलहान वस्त्या येथे ते जाऊन पोहचायचे. रस्त्यांची, विहिरींची कामे, एकशिक्षकी का होईना शाळा, वनखाते, तलाठी, पोलिस या ठिकाणांची असंख्य कामं,  पाण्याचे टँकर्स, आवश्यक असलेली बी बियाणे, रोजगार, रूग्णांना, गर्भवतींना धुळ्यापर्यंत आणून उपचारांची व्यवस्था करणे, अशा कुणालाही माहित नसलेल्या रचनात्मक कामांमध्ये ते अहोरात्र बुडालेले असायचे.

भौगोलिकदृष्ट्या अवघ्या जगापासून तुटलेल्या वनवासी जीवांना जगायला सर्व मदत ते मनापासून आणि जमेल तेवढी करायचे आणि हे सगळं त्यांच्या जुनाट मोटरसायकलवर फिरून. उन्हातान्हाची, पाऊसपाण्याची, थंडीवाऱ्याची अजिबात पर्वा न करता प्रचंड प्रवास करून घराघराशी संपर्क, लग्नकार्य, उत्सव, सुखदुःखात ते सतत सामील होत.

पण हे निवेदन प्रामुख्याने फक्त डॉ. टाटीयांविषयी नाही.

त्यांच्या याच वाहनाने एकदा दगा दिला. त्यांना गंभीर अपघात झाला. पायाचे हाडच मोडल्यामुळे प्रदीर्घ काळ दवाखान्यात बेडवर खिळून राहणे भाग होते.

त्यांच्या अपघाताची बातमी खेडोपाडी पोहचायला बराच वेळ लागला, पण ती पोहचली तेव्हा ते दाखल असलेल्या हॉस्पिटलपुढे एक मोठीच समस्या उभी राहिली. डॉ. टाटीयांच्या समाचाराला येणाऱ्या वनवासी लोकांची जत्रेसारखी रीघ लागली.

त्यात उघडेवाघडे पुरूष होते, ठिपक्याठिपक्यांच्या तांबड्या ‘फडक्या’ डोक्यावर घेतलेल्या डॉक्टरांच्या शेकडो लेकुरवाळ्या बहिणी होत्या. म्हातारे, म्हाताऱ्या, तरूण मुलं, मजूर झाडून सगळे भेटायला येऊन जात होते. आठवड्याकाठी एखादी दहा रूपयांची नोट कशीबशी पहायला मिळणारी ३-४ रूपये रोजावर कंबरतोड मेहनत करणारी ही शापीत माणसं.

भेटीनंतर त्या दवाखान्याच्या आवारातच ठिय्या मारून मिरच्या – भाकरीं बांधलेली कळकट फडकी सोडून पोटात भरत आणि डोळ्यातलं पाणी पुसत घरी परत जात.

उसनेपासने घेतलेले पैसे बस भाड्यासाठी खर्च करून आणि तेही शक्य नसेल, तर मैलोन् मैल रस्ता अनवाणी पायांखाली तुडवत रस्ता विचारत विचारत ही माणसं डॉक्टरांना बघायला रांगेने येत होती..

भेटणंही कसं असे? एक एक जण घाबरत घाबरत बेडजवळ जाई. शिस्तीत, आवाज न करता. डॉ. टाटीयांचा हात हातात घेई. आया बाया त्यांची बला घेत, म्हातारी कोतारी माणसं त्यांच्या डोक्यावरून, कपाळावरून, गालांवरून मायेनं हात फिरवीत आणि गहिवरलेल्या अहिराणीत आशिर्वाद देत....

पण हा प्रत्येक ‘व्हिजिटर’ एक गोष्ट न चुकता करीत होता. निरोपाचा रामराम झाला, कि डॉक्टरांच्या उशीखाली हात त्यांचा हात जाऊन बाहेर येई.

टाटीया कुटुंबातील कुणालाच कळेना हे काय सुरू आहे? एकाला विचारले तर उत्तर आलं, “काही नही भाऊ, आहेर करना पडस. आजारी मानुसले”.
हे ऐकताक्षणी डॉ. टाटीयांनी चट्कन उशी बाजुला करून पाहिलं. सगळे उपस्थित थक्क झाले आणि डोळ्यांत पाणी तरारलं. काही क्षणातच त्या पाण्याचं अश्रुधारा आणि हुंदक्यांत रूपांतर झालं...

उशीखाली एक रूपया, दोन रूपये, पाच रूपयांच्या बारीक घड्या घातलेल्या असंख्य मळक्या नोटा, चार आणे आठ आण्याची, अगदी दहा-वीस पैशांचीदेखील काही नाणी होती.

आजारी माणसाला उपचारांचा न झेपणारा खर्च असतो आणि त्याचे मित्र, सगेसंबंधी, जातभाई, रक्ताची माणसं यांनी त्यात जमेल तेवढा खारीचा वाटा उचलणं हे त्यातल्या प्रत्येकाचं  कर्तव्य असतं या धारणेतून निर्माण झालेली  “आजारपणाच्या आहेरा”ची पिढ्यान् पिढ्या सुरू असलेली परंपरा ही माणसं डॉ. टाटीयांच्या बाबतीतही इमानाने पाळत होती.

खरं तर हॉस्पीटलचं बिल बरंच होणार होतं आणि टाटीया परिवारही काही फार श्रीमंत नव्हता. ही 'आहेराची' सगळी रक्कम मोजली तरीही दवाखान्याच्या एका दिवसाच्या खर्चाहून अधिक होणार नव्हती. पण एक रूपया, दोन रूपयांची किंमत काय असते हे धुळे जिल्हयातल्या त्या  निष्कांचन, आदिवासी भागात गेल्याशिवाय आपल्यातल्या कुणालाही अजिबात कळणार नाही.

हे सगळं सांगतांना धरमचंदच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या, आणि आमच्यासारख्या तरूण कोवळ्या कार्यकर्त्यांना देखील ऐकतांना अश्रु अनिवार झाले. त्या क्षणी सगळ्यांनाच असं वाटत होतं की आपणही डॉ. टाटीयांसारखंच व्हायचं.

तो निर्धार आता अनेक कारणांनी इतिहासजमा झाला. पण त्या तीव्र आणि अपूर्ण  इच्छेच्या सावल्या भुते बनून अद्यापही माझ्याप्रमाणेच सर्वांना त्रास देत असणार हे नक्की.

शहरी भागात कितीही कष्ट उपसले तरीही एवढी कृतज्ञता, एवढा सन्मान, एवढं प्रेम कुणाही सामाजिक कार्यकर्त्याच्या नशिबी क्वचितच येतं.

कुणीही कसलीही भाषणं, प्रवचनं न देता, कुठलाही थोर संत न लाभलेल्या या मंडळींची चांगुलपणावरची, सत्कृत्यावरची ही श्रद्धा.

जिथे ते या जगात आले,वाढले, आणि जिथे त्यांचा
जन्मभराचा रहिवास असणार होता त्या जंगलातच उगवून वाढलेल्या झाडांइतकीच नैसर्गिक आणि तेवढीच उंची असलेली अशी ही 'सहजीवनश्रद्धा' आहे. नाही का?

अशी ‘मेडीकल इन्शुअरन्स स्कीम’ त्यांच्या अक्षरशत्रु पुर्वजांना शेकडो वर्षांपुर्वी सुचली आणि तिचं एका गुप्त व  अखंड चालणाऱ्या परंपरेत रूपांतर झालं असणार.

आपणां तथाकथित सुविद्यांना देखील असं काही सुचेल तो सुदिन

परमेश्वरा, पुढील जन्मी मला फार मोठा माणुस नको बनवूस. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तिवर तेवढंच निष्कपट प्रेम करणारा, वेळ पडली तर त्या प्रेमापोटी अगदी न झेपणारा देखील त्याग करणारा असा त्या गर्दीतील एखादा उपाशीपोटी,अशिक्षीत पण कृतज्ञ आदिवासी बनलो तरी मी तुझा आभारी राहीन.

मिलींद हिरे

No comments:

Post a Comment